कागदावरील घोषणा नको, मदतीची तारीख सांगा’ : आदित्य ठाकरे

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी) राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाल्यानंतरही शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष मदत कधी पोहोचणार, असा थेट सवाल शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. 

रविवारी (२७ सप्टेंबर) सायंकाळी चार वाजता गंगापूर तालुक्यातील भगतवाडी येथे शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन त्यांनी पिकांची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

राज्य सरकारने २६ सप्टेंबर रोजी दुष्काळ व्यवस्थापन संहितेतील ‘ट्रिगर-१’ निकषांनुसार ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी “दुष्काळ जाहीर करा, ही सगळ्यांची मागणी होती. आता दुष्काळ जाहीर झाला; पण शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष मदत कधी येणार?” असा सवाल केला.

 कर्जमाफीच्या घोषणाही झाल्या; मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पैसे मिळाले का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
‘GR निघाला; पण शेतकऱ्यांच्या हातात मदत कधी?’ दुष्काळ जाहीर करण्यासोबत सरकारने पीक कर्ज पुनर्गठन, कृषी कर्जवसुलीस स्थगिती, जमीन महसुलात सवलत तसेच कृषी पंपांच्या वीजबिलासंदर्भात विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. मात्र या सवलतींची अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष आर्थिक मदतीची तारीख स्पष्ट करावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.

मुख्यमंत्री स्वतः ला शेतकऱ्याचा मुलगा म्हणतात. मग शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, हे त्यांनी स्पष्ट सांगावे. केवळ जीआर काढून भागणार नाही; मदत शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचली पाहिजे,” असे ठाकरे म्हणाले.

-- मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांवर चिंता -- 

मराठवाड्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांवरही आदित्य ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. उपलब्ध वृत्तांनुसार जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या आठ महिन्यांत मराठवाड्यात ६५३ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. 

दुष्काळ, पिकांचे नुकसान, कर्जबाजारीपणा आणि आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने आधार देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

-- ‘दुष्काळग्रस्तांसाठी शिवसेनेची मदत केंद्रे -- 

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत, कागदपत्रे आणि विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात मदत केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली.

“शेतकऱ्यांना केवळ आश्वासन नको, प्रत्यक्ष मदत हवी,” हा मुद्दा त्यांनी भगतवाडी येथील भेटीत अधोरेखित केला. यावेळी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार राहुल पाटील, धाराशिवचे आमदार कैलास पाटील, उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील, राजेंद्र दानवे, तालुका प्रमुख सुभाष कानडे,रावसाहेब टेके, विभाग प्रमुख कारभारी दुबिले, उपतालुकाप्रमुख लक्ष्मण सुपेकर पंचायत समिती सदस्य रावसाहेब टेके पंचायत समिती सदस्य मेनका कैलास म्हस्के भिमराज ठोकळ, सरपंच विनोद इथापे, सुरेंद्र सूर्यवंशी, राजू गावंडे, कैलास मस्के, शिवाजी शिंदे, शिवाजी मस्के, राजू जैस्वाल, सोमनाथ गावंडे, ज्ञानेश्वर गावंडे, गोरख जंजाळे, रमेश पाटील गव्हांदे,, कांता टेमकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.